ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांचा कालावधी वाढला

बीडब्ल्यूएफतर्फे स्थगित बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन

नवी दिल्ली – करोनाच्या धोक्‍यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली गेल्याने मिळालेल्या अतिरिक्‍त वेळेत जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) स्थगित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक पात्रतेच्या सर्व स्पर्धा सुरू करणार आहे.

महासंघाने जगभरातील जास्तीत जास्त खेळाडूंना ऑलिम्पिक पात्रतेची संधी मिळावी, यासाठी केवळ 6 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 22 स्पर्धांचे वेळापत्रक तयार केले होते. त्यावेळी सर्व संलग्न देशांच्या संघटनांनी याला विरोध केला होता. तसेच अनेक देशांनी महासंघाच्या या निर्णयावर टीकाही केली होती. त्यावेळी महासंघाने आपली भूमिका बदलत परिस्थिती पाहून पुढील स्पर्धांचे नियोजन करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार येत्या काळात ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक पात्रता स्पर्धा ठरावीक अंतराने आयोजित करण्यात येतील, असे महासंघाने जाहीर केले.

पात्रता स्पर्धा जेव्हापासून स्थगित करण्यात आल्या त्यावेळचे खेळाडूंचे रेटिंग गुण व क्रमवारी कायम ठेवली जाणार असून नव्याने पात्र ठरलेल्या खेळाडूंचीही त्यात वर्णी लावली जाणार असल्याचेही महासंघाने जाहीर केले आहे.

करोनाचा धोका व एकूणच वातावरण यांचा आढावा घेतल्यावर महासंघाने हा निर्णय घेतला असून पुढील काळात खेळाडूंसाठी व्यस्त कार्यक्रम न ठेवता त्यांना आवश्‍यक विश्रांतीही मिळावी यासाठी हे नवे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी या स्पर्धा होणार असून त्यातून आणखी काही खेळाडूंना पात्रतेची संधी मिळणार आहे. या पात्रता स्पर्धांमधून पात्र ठरलेल्या खेळाडूंना सरावासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.