नवी दिल्ली: ऑगस्टावेस्टलॅंड प्रकरणातील दलाल राजीव सक्सेना याची तब्बल 385 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. ती कारवाई सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केली.
ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्टच्या (पीएमएलए) अंतर्गत सक्सेनाविरोधात कारवाईचे पाऊल उचलले. सक्सेनाच्या दुबईमधील व्हिलावर जप्ती आणली गेली. तसेच, त्याच्या स्विस बॅंकेतील पाच खात्यांवरही टाच आली. सक्सेना हा दुबईस्थित व्यावसायिक आहे. त्याचे मागील वर्षी संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) प्रत्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ईडीने त्याला अटक केली. अतिमहत्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींच्या प्रवासासाठी काही वर्षांपूर्वी ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती.
मात्र, 3 हजार 600 कोटी रुपयांच्या त्या व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्यामुळे तो व्यवहार रद्द करण्यात आला. त्या व्यवहारासाठी काही आरोपींना लाच मिळाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. त्या व्यवहाराशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणावरून सक्सेना ईडीच्या रडारवर आला आहे. त्या प्रकरणात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचा भाचा रतुल पुरी यालाही आरोपी करण्यात आले आहे.