नाशिक – फरार ड्रग तस्कर ललित पाटीलचे प्रकरण राज्यभरात गाजत असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलचा नाशिकस्थित असलेला ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी केली असून नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीत कोट्यवधींच ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातुन पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ऍक्शन मोडवर आले असून याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून तो फरार झाल्यानंतर नाशिकच्या घरी देखील पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात येत होती. या माध्यमातून साकीनाका पोलिसांचा तपास सुरु असताना धक्कादायक माहिती समोर आली असून तब्बल तीन दिवसांच्या कारवाईतून नाशिकमध्येच ड्रग्ज बनविण्याचा कारखाना असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
नाशिकमधील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज बनविण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्ज निर्मिती सुरू होती, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान साकीनाका पोलिसांकडून तीन दिवस कारवाई सुरु होती. यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हाच नाशिकमध्ये श्री गणेशाय इंडस्ट्रीजच्या नावाने ड्रग्ज निर्मिती करत असल्याचे समोर आले.
या कारवाईत मुंबई पोलिसांना ड्रग बनविण्याचा दीडशेहुन अधिक किलोचा कच्चा माल सापडला असून पोलिसांनी हा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी कंपनी मालकासह कामगारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राज्यातील ड्रग्जचे मोठ रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.