पुणे – हडपसर भागातील काळेपडळ परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य सूर्यवंशी, आदित्य मोहोळकर यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल बाळासाहेब लोंढे (वय १९, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) याने याबाबत हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद होता. अमोल आणि त्याचा मित्र उमेश ससाणे यांनी काळेपडळ परिसरात टँकर मागविला होता.
टँकरमधून पाणीवाटप सुरू असताना आरोपी सूर्यवंशी आणि मोहोळकर यांना धक्का लागल्याने वाद झाला. त्यानंतर सूर्यवंशी आणि मोहोळकर साथीदारांसह काळेपडळ परिसरात दुपारी आले. त्यांनी शिवीगाळ करून रस्त्याकडेला लावलेल्या रिक्षा, मोटारी, टेम्पोच्या काचा दांडक्याने फोडल्या.
दांडके उगारून परिसरात दहशत माजविली. काळेपडळ ते प्रगती मैदान परिसरातील नऊ ते दहा वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.