पुणे – कल्याणीनगर, वडगावशेरी, घोरपडी, तसेच कोरेगाव पार्क परिसरासह शहराच्या उपनगरांमध्ये रूफ टॉप हॉटेल, रेस्टॉरंट, पब येथे दारूविक्रीचा परवाना देण्यापूर्वी त्या जागेवर महापालिकेची परवानगी देऊन बांधकाम केले आहे की नाही, याबाबत महापालिकेची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेतले जावे, अशी मागणी महापालिकेने जानेवारी महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
मात्र, महापालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेची परवानगी न घेताच शहरात अनेक भागात पब, तसेच इमारतींवर रूफ टॉप हॉटेल्स उभी राहिली असून, सर्वसामान्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील निवासी, बिगरनिवासी मिळकतीची गच्ची, मोकळ्या जागांमध्ये हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पार्टी, तसेच धिंगाणा चालत असल्याच्या मोठ्या तक्रारी विमाननगर पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी महापालिकेस या तक्रारी पाठवून याप्रकरणी बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यातच डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यात औंध भागात एका रूफ टाॅप हाॅटेलला आग लागल्यानंतर हे हाॅटेल अनधिकृत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील अशा हाॅटेलचे सर्वेक्षण करून तातडीने ती पाडण्याचे, तसेच त्यांना तीनपट कर आकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
मात्र, त्यावेळी आम्हाला राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असल्याचे दाखवून कारवाईस विरोध झाला होता. त्यामुळे महापालिकेने आपली कारवाई थांबवून परवाना देताना महापालिकेचे एनओसी घ्यावी, अशी मागणी केली होती.
मग आता कारवाई कशी?
जानेवारी महिन्यात जे परवाने दाखवून कारवाई थांबविण्यात आली होती. त्या हाॅटेल, पब, तसेच रूफटाॅप हाॅटेलवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आता कल्याणीनगर दुर्घटनेनंतर दिले आहे. त्यानंतर महापालिकेनेही कल्याणीनगर, खराडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, घोरपडी येथील अनधिकृत रूफटॉप हॉटेल, पब, रेस्टॉरंटवर कारवाईस सुरुवात केली आहे. मग आता नियमांचा अडथळा का येत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.