Chhagan Bhujbal | Uddhav Thackeray – राज्यात सरकार आमचे आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असतानाच सरकारमधील मंत्रीच आता उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. याप्रकरणी राजकारण देखील तापण्याचे चित्र आहे.
भुजबळ यांनी घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सर्रास त्यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू सावरून घेतल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ”राज्यात सरकार आमचे आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे.
मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे? राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यासाठी येतात. व्यापारी सर्वांच्याच भेटीला जातात, फोटो काढतात. यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही. या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये”, असे छगन भुजबळ म्हणाले.
पुढे भुजबळ म्हणाले, ”मुंबईत विमानतळाकडे जाताना असे अनेक हॉर्डिंग दिसतात. ते होर्डिंग समांतर हवे होते पण ते रस्त्यावर आहेत. त्यांचे वजन सुद्धा भरपूर आहे. हे सर्व अनधिकृत आहेत.
त्या सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे. हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ कशाला काढता? आता सर्व प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे”, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.