आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार

मेंढपाळांना संरक्षण द्या : मंत्रालयात दुपारी बैठक

बारामती (प्रमोद ठोंबरे) – राज्यात मेंढपाळांवरील हल्ले वाढत असून त्यांना संरक्षण मिळावे तसेच धनगर आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी धनगर समाजाचे शिष्टमंडळ आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटणार असून गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. संपूर्ण राज्यातील धनगर समाजाची लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

राज्यात धनगर समाजातील मेंढपाळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असून हल्ले रोखण्यासाठी सरकारने उपाय योजना करावी तसेच मेंढपाळांना कायद्याने संरक्षण द्यावे अशी मागणी मेंढपाळ हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आली होती.

त्यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, हरिदास भदे, रमेश शेंडगे, रामराव वडकुते, रामहरी रुपनवर तसेच गणेश हाके, मदनराव देवकाते, नवनाथ पडळकर , शशिकांत तरंगे, सक्षणा सलगर, राष्ट्रवादी युवक प्रदेशचे उपाध्यक्ष किशोर मासाळ आदींच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाची शिष्टमंडळ गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटणार आहे. राज्यातील धनगर समाजातील इतर नेत्यांच्या देखील यामध्ये समावेश आहे. मुंबई येथे चार वाजता ही बैठक संपन्न होणार आहे.

राज्यातील मेंढपाळ वरील हल्ले रोखण्यासाठी कायद्याचे संरक्षण, धनगर आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यात यावे, मेंढपाळांना स्वसंरक्षणार्थ बंदुकीचा परवाना देण्यात यावा , वनविभागाच्या क्षेत्रात चराईसाठी कुरणे आरक्षित करावीत अशा विविध प्रकारच्या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील मेंढपाळांना कायद्याने संरक्षण देण्यात यावे. त्यामुळे मेंढपाळावरील हल्ले रोखले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे मराठा समाजातील आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यात आले त्याचप्रमाणे धनगर समाजातील आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्यात यावेत. आंदोलनातील गुन्ह्यांमुळे धनगर समाजातील तरुणांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. दाखल गुन्ह्यांमुळे तरुणांची फरफट होत आहे. राज्य सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन गुन्हे मागे घ्यावे.

-किशोर मासाळ, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.