बारामती (प्रतिनिधी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी प्रचाराचा धुराळा उडाला. प्रचाराच्या सांगता सभेत आरोप प्रत्यारोपाबरोबरच भावनिक किनार देखील पाहायला मिळाली. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार रिंगणात उतरल्याने टोकाचा प्रचार झाला.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांची बारामतीत सांगता सभा जोरदार रंगली. भाषणादरम्यान रोहित पवार भावूक झाले. शरद पवार यांच्याविषयी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर अजित पवार यांनी ही चौफेर टोलीबाजी करीत रोहित पवार यांच्या रडण्याच्या नक्कल केली.
नौटंकी, रडीचा डाव चालणार नाही – अजित पवार
राजकारणाचे बाळकडू आम्ही पाजले तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत, असा टोला अजित पवर रोहित पवार यांच्या रडण्यावर अजितप पवार म्हणाले की, मी आधीच सांगितले होते असा ड्रामा होणार, कोणीतरी डोळ्यातून अश्रू काढून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आणि तसे झाले.
पठ्याने डोळ्यातून पाणी काढलेच, असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांची नक्कल केली. डोळ्यातून पाणी काढण्याचे नाटक करत त्यांनी रुमालाने डोळे पुसले. मी पण रडतो मते द्या असे म्हणत त्यांनी नौटंकी व रडीचा डाव चालणार नाही. बारामतीकर सहन करणार नाहीत. विकासाचे खणखणीत नाणे दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विकास कोणा एकाने केला नाही – सुळे
मोठा भाऊ म्हणून अजित पवार यांचा नेहमीच सन्मान केला. पण आमचा चांगुलपणा नडला, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. कोणी सांगितली ही आमची शेवटची निवडणूक आहे. पण ही आमची पहिली की शेवटची निवडणूक हे आमचा पांडुरंग ठरवेल. बुरसटलेल्या विचारातून हे पुढे येत आहे. बारामतीचा विकास कोणा एका व्यक्तीने केला नाही. आमचा शेवटचा दिवस आहेत की नाहीत यापेक्षा आता तुमचे दिवस मोजा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी यांना दिला.