मनुष्यबळाअभावी सेवेवर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही
158 जणांची करोनावर मात/ 150 क्वॉरंटाइन/ 8 जणांचा मृत्यू
पुणे – पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत महावितरणच्या विविध कार्यालयातील करोना संसर्ग झालेल्या एकूण 249 पैकी 158 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर दुर्दैवाने 8 वीज योद्धांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 83 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच, सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी करोनाच्या संसर्गजन्य लक्षणांमुळे घरी क्वॉरंटाइन आहेत. मात्र, करोनाशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी अन्य वीज योद्ध्यांनी कर्तव्य बजावत महावितरणच्या ग्राहकसेवेवर मनुष्यबळाअभावी कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील 5 ते 6 महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतरचा संततधार पाऊस, पूरस्थिती अशा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे वीजयोद्ध सज्ज असतात.
मात्र, यंदा ही परिस्थिती अधिकच गंभीर होती. त्यातच मार्चपासून करोनाचा संकटकाळ सुरु झाला. तथापि, सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयोद्ध्यांनी जीवाचे रान करीत एप्रिल, मे-मधील अवकाळी वादळी पावसाला तोंड देत जलदगतीने कर्तव्य बजावले.
दैनंदिन कामांसोबतच एकीकडे करोनाबाधित रुग्णांसाठी ससूनच्या 11 मजली नवीन इमारतीसाठी केवळ 36 तासांमध्ये नवीन उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वित करणे तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाच्या अभुतपूर्व तडाख्याने प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा जलदगतीने उभारणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आदी विशेष कामे देखील युद्धपातळीवर अहोरात्र केली आहेत.
मोबाइलवर सर्व ई-सेवा…
महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा मोबाइल ऍप तसेच www.mahadiscom.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. तसेच वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. या सेवांचा घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.