अक्षय्य तृतीयेची सजावटही रद्द

पुणे – करोना विषाणुच्या उद्रेकामुळे उद्भविलेल्या गंभीर परिस्थितीमुळे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे येत्या रविवारी (26 एप्रिल) करण्यात येणारी अक्षय्यतृतीयेची सजावट रद्द करण्यात आली आहे. यासाठी लागणारा निधी विद्यार्थी भोजन सहाय्य योजनेस आणि करोना वैद्यकीय मदतीसाठी वापरण्याचा निर्णय ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने घेतला आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले की, यंदा करोना परिस्थितीमुळे अक्षयतृतीयेला करण्यात येणारी सजावट रद्द करण्यात आली आहे. तसेच चैत्र अमावस्या हा दिवस श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या संस्थापिका कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचा पुण्यस्मरण दिन आहे. यादिवशी ट्रस्टतर्फे गेली 123 वर्षे पुरातन श्री दत्त मंदिरामध्ये वासंतिक पुष्पोत्सव होतो.

अवघे पुणेकर कैरीची डाळ, पन्ह्याचा प्रसाद घेण्यासाठी मंदिरामध्ये येण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच याकरीता खर्च होणारा निधी गेले महिनाभर दैनंदिन सुरू असलेल्या विद्यार्थी भोजन सहाय्य योजनेस आणि वैद्यकीय मदतीसाठी वापरला जाणार आहे.

पुण्यतिथीनिमित्त मंदिरात ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते व वंदना मोहिते यांचे हस्ते लघुरुद्र आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन झाले. तसेच समस्त जगताची या करोनातून लवकर मुक्तता व्हावी, ही प्रार्थना देखील करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.