मुंबई: सध्या आर्थिक अडचणीत आलेल्या मुंबईतील पंजाब ऍन्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेचे अध्यक्ष वरयम सिंग यांच्या संशयास्पद व्यवहारांमुळे त्यांची बॅंकेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी असा आदेश गेल्याच वर्षी रिझर्व्ह बॅंकेने जारी केला होता. पण तो आदेश डावलून सिंग यांनाच बॅंकेच्या अध्यक्षपदी राहु देण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे हे आदेश राज्य सरकारच्या सहकार निबंधकांकडेही पाठवण्यात आले होते पण तेथेही कोणतीही हालचाल झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बॅंकेने दिलेल्या एकूण 8880 कोटी रूपयांच्या संशयास्पद कर्ज वितरण प्रकरणात त्यातील 6500 कोटींचे कर्ज एकट्या एचडीआयएल या दिवाळखोरीत गेलेल्या समुहाला देण्यात आले आहे. पीएमची बॅंकेचे अध्यक्ष सिंग हे या समुहाच्या संचालक मंडळावर नऊ वर्ष कार्यरत होते व समुहातील काहीं शेअर्सही त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे स्वहितासाठीच त्यांनी हे कर्जवाटप केल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सहकार खात्याच्याहीं निदर्शनाला आणले होते.
एचडीआयएल हा समुह गेली तीन वर्ष तोट्यात आहे. पण तरीही पीएमसी बॅंकेकडून या समुहाला सतत कर्ज वाटप केले जात होते. अगदी गेल्या महिन्यात 31 ऑक्टोबरलाही पीएमसी बॅंकेकडून या समुहाला 95 कोटी 50 लाखांचे कर्ज देण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.