अद्यापही नागरिक एजंटांच्या कचाट्यात

वाहन परवाना प्रक्रिया सोपी होऊनही नागरिकांकडून प्रतिसाद नाही

पुणे – शहरातील वाढत्या वाहन संख्येसह वाहन परवान्यासाठी अर्जांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परवाना काढण्यासाठी कोट्यामध्ये वाढ केली आहे. परंतु, अनेकदा पुरेशा माहिती अभावी नागरिक अनधिकृत एजंटद्वारे परवाना काढतात. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सध्याच्या युगांत परिवहन विभाग “हायटेक’ झाला आहे. मात्र, अजूनही शासकीय कामांसाठी होणारी नागरिकांची “आर्थिक’ लूट थांबत नसल्याचे चित्र “आरटीओ’मध्ये सर्रास सुरू असते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वारंवार नागरिकांना परवाना प्रक्रिया “ऑनलाइन’ झाली आहे, असे सांगण्यात येते. परंतु, नागरिकांमध्ये सजगता नसल्याने “कमी पैशांत परवाना काढून देतो’, असे सांगत अनेकदा फसवणूक होते. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून परवाना प्रक्रिया पूर्ण केल्यास अधिक सोप्या पद्धतीने परवाना काढता येतो. त्यामुळे कोणत्याही जाहिरातींना बळी न पडता अधिकृतपणे परवाना काढावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

वयाची 18 वर्षे पूर्ण असणारी व्यक्‍ती वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करू शकते. तर, परवान्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्राथमिक लेखी चाचणी द्यावी लागते. या चाचणीच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये मोटार वाहन कायदा आणि वाहतूक नियमांविषयी प्रश्‍नांचा समावेश असतो. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास उमेदवाराला परवाना मिळतो. तर शिकाऊ परवाना काढून एक महिना पूर्ण झाल्यानंतर पक्‍क्‍या वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी अर्ज करता येतो. या परवान्यासाठी वाहन चालवण्याची चाचणी उमेदवाराला द्यावी लागते, अशी माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार शिकाऊ परवान्यासाठी “नॉमिनल’ अंतर्गत 151 रुपये आणि “फ्रेश’ अंतर्गत 201 रुपये इतके शुल्क आकारले जाते. तर पक्‍का परवाना काढण्यासाठी 766 रुपये आणि परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी 466 रुपये आकारले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.