पाथर्डी -तालुक्यातील शिरसाटवाडी तलावात सोमवारी दुपारी सव्वादोन वर्षांच्या छोट्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित मुलीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करून घेण्याचे आदेश दिले होते. शवविच्छेदन अहवालानुसार या मुलीचा पाण्यात बुडूनच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली.
तालुक्यातील शिरसाटवाडी तलावाजवळ बारकेराव सर्जेराव घुगे (वय 65) हे आपल्या पत्नीसह दोन नातवांना घेऊन राहतात. तर मुलगा व सून हे आपल्या दोन्ही मुलांना घरीच ठेवून उसतोडणीसाठी सांगली जिल्ह्यात गेलेले आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सव्वादोन वर्षांची मुलगी घराच्या अंगणात खेळत असतांना अचानक गायब झाली होती.
दरम्यान, दुपारी मुलीचा मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. शवविच्छेदन अहवालानुसार या मुलीचा यात बुडूनच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.