सातारा, (प्रतिनिधी) – महायुतीतर्फे लोकसभा सातारा मतदारसंघात निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. या निवडणुकीला खा. उदयनराजे म्हणजेच मीच उभा आहे असे समजा आणि माझा शब्द खाली पडू देऊ नका. पाटण तालुक्यातून अधिकचं मताधिक्य देवून खा. उदयनराजेंना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि पाटणवासियांना केले.
गुढे व ढेबेवाडी येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पाटण तालुक्यात पर्यटन व औद्योगिक विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आम्ही उपलब्ध करुन देवू, असे याप्रसंगी खा. उदयनराजे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आज गुरुवार दि. २५ रोजी पाटण तालुक्यातील गुढे, ढेबेवाडी येथील प्रचार दौऱ्यात खा. उदयनराजेंचे जोरदार स्वागत झाले. काळगाव व कुंभारगाव विभागातील महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे येथे तर ढेबेवाडी येथे ढेबेवाडी विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या दोन्ही मेळाव्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत कमळ या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करायचे आहे तर विधानसभा या निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करायचे आहे. या निवडणुकीला खा. उदयनराजे म्हणजेच मीच उभा असे समजून सर्वांनी भरघोस मतदान करावे, असे आवाहन शंभूराज यांनी केले.
पाटण तालुक्यात पर्यटन व औद्योगिक या क्षेत्रासह सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू असे याप्रसंगी खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले. मेळाव्याला दोन्ही ठिकाणी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.