नवी दिल्ली – करोनामुळे 25 मार्चपासून देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जारी केला आहे. सर्व क्षेत्रातील कामकाजावर याचा परिणाम झाला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे देशातील सर्व उच्च न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (व्हीसी) माध्यमातून कामकाज व्हावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 142 नुसार विशेषाधिकाराचा वापर करून हा आदेश बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सद्यस्थितीमध्ये पारंपरिक कामकाजात बदल करून आपले कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणाऱया कामकाजाबाबतचे धोरण तयार करण्यात यावे, असा आदेशही उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना दिला आहे. हे कामकाजाचे धोरण वकील, न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचारी वर्गासाठी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू आहे. सरन्यायाधीशांनीही काही अतिशय महत्त्वाच्या आणि तातडीच्या विषयांच्या खटल्यांची सुनावणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच देशातील सर्वच उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.