सातारा (प्रतिनिधी) – दहावी, बारावी, पदवी परीक्षेनंतर उज्वल भवितव्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या करिअर मॅपिंग आणि प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आणि करिअर समुपदेशक प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यादीप फाउंडेशन सातारा आणि गुगल एज्युकेटर ग्रुप यांनी अनेक करिअर मार्गदर्शन उपक्रम हे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी विनाशुल्क उपलब्ध केले आहेत.
या उपक्रमामध्ये आजपर्यंत ४७० हून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग घेत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन या उपक्रमांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध उपक्रमामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होत असून अभ्यासक्रम निवडीच्या दृष्टीने निर्णयक्षम होत आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक सतीश शेंडे आणि विद्यादीप फाउंडेशनच्या कार्यवाह डॉ. विद्या ताटपुजे यांनी दिली.
या कार्यक्रमांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन करिअर संवाद, वैयक्तिक करिअर समुपदेशन,विद्यार्थ्यांसाठी करिअर संदर्भ साहित्य उपलब्धता (करिअर ग्रंथालय), गुगल क्लासरूम फॉर करिअर प्लॅनिंग, करिअर माहिती विश्लेषण आणि संदर्भ सेवा, करिअर प्लॅनिंग ऑडिओ पॉडकास्ट, व्हॉट्सअप ग्रुप द्वारे ई-करिअर साहित्य आदान-प्रदान सेवा, करिअर मॅप कृतीशील उपक्रम, आणि करिअर गायडन्स लॅब यांचा समावेश आहे.
काही उपक्रमांसाठी विद्यार्थी हे स्मार्टफोन किंवा लॅपटॉपचा करिअर मॅपिंग आणि प्लॅनिंगसाठी कौशल्यपूर्ण उपयोग करून घेत आहेत. अन्य विद्यार्थ्यांकरता ऑफलाइन उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे.