विद्यमान सरकार तीन पायांचे : वैभव पिचड

अकोले  -तीन पायांच्या राज्य सरकारने करोना महामारीच्या संकटात योग्य नियोजन न केल्यामुळे सर्वच पातळीवर ते अयशस्वी ठरले आहे, अशी टिका माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली. राज्यातील आदिवासी खावटी वाटपात दुजाभाव केल्याने आज ग्रामीण आदिवासी, शेतकरी, शेतमजूर जनतेला उपासमारीसारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. महामहिम राज्यपालांनी त्यांना समज द्यावी, असे स्पष्ट करून अशा सरकारचा भाजपच्या वतीने आम्ही काळे मास्क व काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत, असे ते म्हणाले.

आज अकोले तालुक्‍यात ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत राज्य सरकारचा निषेध केला. राजूर येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे ,जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, उपसभापती दत्तात्रय देशमुख, यशवंत आभाळे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र शेळके, सरपंच गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, कारभारी वाकचौरे आदी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करूनही सरकार मदतीची अपेक्षा करीत आहे. मात्र राज्य सरकारने जनतेसाठी विविध पॅकेज जाहीर करून त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही. राज्य सरकारने केवळ घोषणा करून त्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीमालाला भाव नाही. विकास कामे थांबली आहेत.

रोजगार नसल्याने शेतमजूर कष्टकरी उपाशीपोटी राहत असून सरकारने यावर कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नसल्याने आज करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे येथून लोक गावाकडे येत असल्याने गावागावातील वातावरण बिघडत आहे. त्यात सरपंचांवर हल्ले होत असून त्यांना संरक्षण नाही. स्थानिक आमदार सोशल मीडियावर फोटो टाकण्यात गुंतले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×