नवी दिल्ली : तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल ८० जणांकडून बलात्कार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आले होते. पोलिसांना गुंटूर येथून या मुलीची सुटका केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी तपास केला असता आठ महिन्यात तब्बल ८० जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सर्व ८० नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी मंगळवारी १० जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्याचाही समावेश आहे. अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पीडित मुलीची आई करोना झाल्याने जून २०२१ मध्ये रुग्णालयात दाखल होती. यावेळी सवर्ण कुमारी नावाच्या एका महिलेने तिच्या आईशी मैत्री केली होती. उपाचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्यानंतर महिलेने पीडित मुलीच्या वडिलांना माहिती न देता सोबत घेऊन गेली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासा दरम्यान पोलिसांना मुख्य आरोपी असणाऱ्या सवर्ण कुमार या महिलेची ओळख पटली. जानेवारीमध्ये याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली. आणि मंगळवारी १९ एप्रिलला पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. यावेळी त्यांनी पीडित मुलीची सुटका केली.
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता तसंच मुलीकडे विचारपूस केली असता संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम समोर आला. गेल्या आठ महिन्यांपासून या १३ वर्षीय मुलीला आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या वेश्यागृहात देहव्यापारासाठी पाठवलं जात होतं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सवर्ण कुमारी या महिलेला मुलीला जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याने मुख्य आरोपी केले आहेत.