मुंबई – साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली. एवढेच नाही तर या चित्रपटातील गाणीही रसिकांमध्ये लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग आणखी वाढली आहे.
चित्रपटातील त्याच्या भूमिके शिवाय तो पुन्हा एकदा आपल्या कृतीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं कोट्यवधींच्या मानधन देणारी तंबाखू जाहिरात नाकारली आहे. ज्यामुळे आता त्याचं नाव सगळीकडेच चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तंबाखूचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला बरीच मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र अल्लू अर्जुननं क्षणाचाही विलंब न करता ही ऑफर नाकारली. यासोबतच त्यानं या मागचं कारणही स्पष्ट केलं.
तो म्हणाला,’मला असं वाटत कि तंबाखूचं सेवन करणाऱ्या कुठल्याच जाहिराती करू नये कारण माझ्या चाहत्यांनी मला किंवा माझ्या जाहिराती पाहून तंबाखूचं सेवन करावं असं मला वाटत नाही.’ असं त्यानं ही ऑफर नाकारताना दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलं.
तो पुढे म्हणाला,’मी नेहमी कोणतीही जाहिरात विचार करूनच साइन करतो. आपल्या जाहिरातींमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरेल किंवा चुकीचा संदेश जाईल अशा जाहिराती करणं तो नेहमीच टाळतो.’
त्याच्या या निर्णयाचे सोशलवर कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र आहे. मोठ्या मानधनाची जाहिरात नाकारणारा अल्लू अर्जुन हा पहिलाच अभिनेता नाही. त्याच्या अगोदर साई पल्लवी, विराट कोहली, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर या सेलिब्रेटींनीही अशाप्रकारच्या मोठ्या मानधनाच्या जाहिरातींमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.