पुणे बार असोसिएशनची जिल्हा सत्र न्यायालयास विनंती
पुणे – करोनामुळे शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात उपाययोजना केल्या आहेत. सुनावणीसाठी येणारे पक्षकार तसेच वकिलांची सुरक्षितता विचारात घेऊन न्यायालयात गर्दी होऊ नये, म्हणून सध्या न्यायालयाने कोणतेही महत्त्वाचे निर्णय देऊ नये, अशी विनंती पुणे बार असोसिएशनकडून शुक्रवारी करण्यात आली.
प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, उपाध्यश्र ऍड. योगेश तुपे, ऍड. सचिन हिंगणेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. न्यायालयातील वकिलांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आवारात जनजागृतीसाठी महापालिकेच्या सहकार्याने भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. शिवाजीनगर न्यायालयात गरज असेल, तर पक्षकारांना सुनावणीसाठी बोलवावे. एखाद्या पक्षकाराला काही कारणास्तव सुनावणीसाठी उपस्थित न राहता आल्यास त्याला सूट देण्यात यावी. गरज असेल, तर पक्षकार तसेच वकिलांनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची मुभा देण्यात यावी.
एखाद्या प्रकरणात पक्षकाराचे वकील अनुपस्थित असतील, तर न्यायालयाने ही बाब विचारात घेऊन कोणताही महत्त्वाचा निर्णय देऊ नये. तूर्तास निर्णय राखून ठेवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी दररोज शहर आणि जिल्ह्यातून पक्षकार येतात. करोनामुळे न्यायालयातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी सुरक्षा विचारात घेऊन गरज असेल, तरच उपस्थित राहावे, असे पुणे बार असोसिएशनकडून कळवण्यात आली आहे.