मंचर -महाळुंगे पडवळ-चासकर मळा (ता. आंबेगाव) येथील मारुती चासकर आणि त्यांच्या पत्नी सुमती चासकर हे दोघेही पती-पत्नी मुंबई येथे करोनाच्या महामारीत देशसेवेचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाचा महाळुंगे पडवळ ग्रामस्थांना अभिमान वाटत आहे.
मारुती चासकर मुंबई येथे अग्निशामक दलात काम करतात आणि त्यांच्या पत्नी सुमती चासकर या मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात स्टाफ नर्स (सिस्टर) म्हणून कार्यरत आहेत. दाम्पत्याने आपल्या मुलांना घरी ठेवून करोनापासून देशवासीयांच्या रक्षणासाठी जीवाला असलेला धोका स्वीकारून काम करीत आहेत. सुमती चासकर या गोवंडी येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स (सिस्टर) आहेत. 20 एप्रिलपासून हॉस्पिटलमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्यास सुरुवात झाली.
हॉस्पिटलमधील 25 स्टाफ नर्सेस यांना क्वारंटाइन करण्यात आले. सुमती चासकर यांना घसा दुखी आणि खवखव याचा त्रास सुरू झाला. त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तिसऱ्या दिवशी सुमती चासकर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला; परंतु दुसऱ्याच दिवशी त्या रुग्णसेवेसाठी कामावर रुजू झाल्या. स्टाफची संख्या कमी असल्यामुळे त्या रुग्णालयात पूर्णवेळ काम करीत आहेत.
मारुती चासकर हे मुंबई अग्निशामक दलात फायर फायटर म्हणून काम करतात. करोनाचा नायनाट करण्यासाठी आपल्या जीवाला धोका समोर दिसत असताना महानगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे मुंबईतील गलोगल्ली, रस्ते, झोपडपट्टी येथे सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्याचे कर्तव्य ते बजावत आहेत. हे दाम्पत्य करोनाच्या युद्धात आपल्या मुलांना घरी ठेवून समाजसेवेचे, रुग्णसेवेचे काम करीत आहेत, ही बाब इतरांना प्रेरणा देणारी आहे.