नवी दिल्ली – स्थानिक स्पर्धेत सरस कामगिरी होत असतानाही दिल्ली संघात निवड व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी तत्कालीन निवड समिती सदस्याने माझ्या वडिलांकडे लाच मागितली होती, असा धक्कादायक खुलासा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने केला आहे. भारतीय फुटबॉल संघाचा अव्वल खेळाडू सुनील छेत्री याच्याशी सोशल मीडियावर चॅट करताना कोहलीने हे धक्कादायक विधान केले आहे.
माझे वडील प्रेम कोहली हे वकील होते. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले त्यामुळे या गोष्टींना त्यांचा कायमच विरोध होता. जेव्हा संघ निवड जाहीर होणार होती तेव्हा या सदस्याने वडिलांशी संपर्क साधला व तुमच्या मुलाकडे गुणवत्ता आहे; परंतु त्याला जर नियमितपणे दिल्ली संघात खेळवायचे असेल तर तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले होते. पण माझा मुलगा केवळ गुणवत्तेच्या व कामगिरीच्याच जोरावर निवडला जाईल असा मला विश्वास आहे, असे त्यांनी या सदस्याला सांगितले होते, असेही कोहली म्हणाला.
दिल्ली संघातील निवडीबाबत अनेक खेळाडूंच्या बाबतीत अशा घटना त्यावेळी घडल्या होत्या, असेही कोहलीने सांगितले.