लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही दुकाने बंदच
पुणे – पुणे शहर तसेच उपनगरांतील अंदाजे चार ते साडेचार हजार लॉंड्री व्यावसायिक लॉकडाऊनच्या कालावधीत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता, लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात गेल्याने आणखी एक-दोन महिने तर दुकानाचे कुलूप निघणार नसल्याने या लॉंड्री तसेच ड्रायक्लिनिंग, धोबी अशा व्यवसायाचाच चोळामोळा होणार असल्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही दुकाने सुरू करण्याबाबत सरकारने परवानगी दिली असली तरी यामध्ये लॉंड्री व्यवसायाचा कोठेही उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दुकाने सुरू नसली तरी दुकानाचे भाडे, रखडलेले वीजबिल, मशीनरीसाठी घेतलेले कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार असे अनेक प्रश्न या व्यावसायिकांपुढे निर्माण झाले आहेत.
पुणे शहर तसेच उपनगर परिसरात चार ते साडेचार हजारांच्या आसपास लॉंड्री व्यावसायिक आहेत. यासह ड्रायक्लिनिंग, घाटावरचे धोबी, कपड्यांचे रंगारी असे व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मार्च ते मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने या कालावधीत हे व्यवसाय जोरात असतात. कपड्यांचे काही होलसेल विक्रेते, दुकानदार यांच्याकडूनही काही तागे धुणे तसेच रंगासाठी मिळत असतात. यावेळी मात्र 20 मार्चपासून लॉकडाऊन कालावधीत 20 मार्चपासून व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे हे व्यावसायिक सांगतात. इस्त्री केलेल्या कपड्यांनुसार पगार मिळत असल्याने दुकानात काम करणारे कामगार आपापल्या गावी गेले आहेत. तर मालकांपुढे दुकानभाड्यासह अन्य प्रश्न उभे राहिले आहेत.
शहर तसेच उपनगरांत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. इस्त्री, ड्रायक्लिनिंग, रंगारी अशी वेगवेगळी कामे ते करतात. लॉकडाऊनच्या कालावधीत दोन महिन्यांत रोजगार मोठ्या प्रमाणात बुडाला आहे. अनेकांच्या डोक्यावर कर्ज आहे. त्यातून आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
– प्रकाश अभ्यंकर, अध्यक्ष, पुणे शहर लॉंड्री व्यावसायिक संघटना