सुरेश डुबल
बाळासाहेब निघाले अर्ज भरायला; युतीतून कोण भरणार अर्ज?
कदमांची भूमिका संदिग्ध
मागील निवडणूक कदम यांनी कॉंग्रेसकडून लढविली. त्यांना चांगली मतेही मिळाली. त्यानंतर त्यांची भूमिका संदिग्ध राहिली आहे. संधी मिळेल तिकडे जाणे यात कदमांचा हातखंडा. त्यांनी कॉंग्रेस केव्हाच सोडली आहे. मात्र, ते ना भाजपवासी झाले आहेत, ना शिवसेनेत गेले आहेत. त्यंनी घेतलेल्या मेळाव्यांमध्ये मात्र भाजपचे फलक दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
कराड – विधानसभेची घोडदौड जोरात सुरू आहे. 4 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख असूनही कराड उत्तरमध्ये युतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. राज्यात युतीचं घोडं अडल्याने ही वेळ आली आहे. नेहमी एक पाऊल पुढे असणारे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील हे उद्या अर्ज भरायला निघाले आहेत. कराड उत्तरमधील उमेदवार आत्ता निश्चित केला तर बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याने युतीने सस्पेन्स ठेवला आहे.
पितृपंधरवडा संपल्यानंतर राजकीय घट बसू लागले आहेत. सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यास तयार झाले आहेत. युती होण्याअगोदरच शिवसेनेने ठरावीक आमदारांना एबी फॉर्म दिले आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आठ दिवसांपूर्वी झाली असून त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. त्यामुळे युतीच्या भानगडीत अडकण्यापेक्षा आपली वाटचाल सुरू ठेवावी, युतीचा उमेदवार कोणीही असला तरी अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांनी कंबर कसली आहे.
अर्ज भरण्यास चार दिवस शिल्लक असताना युतीचे घोंगडे भिजत पडले आहे. भाजप व शिवसेना दोघांनीही स्वबळाची तयारी ठेवली आहे. युतीच्या या भानगडीत उत्तरमध्ये पेच वाढला आहे. या मतदारसंघात मनोज घोरपडे व धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक आहेत. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचारातील समान गोष्ट म्हणजे बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो आहेत. कार्यकर्तेही तेच दिसत आहेत. मनोज घोरपडे यांनी मागील निवडणुकीपासूनच आमदारकीची तयारी केली आहे. या मतदारसंघात त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मतदारांची इच्छा आहे.
राजकीय वारे ओळखून धैर्यशील कदम यांनी आपली पावले भाजपकडे वळवली असली तरी या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क असल्याने त्यांनी आपल्या गळ्यात भाजपचा मफलर घातलेला नाही. हा मतदारसंघ शिवसेनेने लढवावा, असे युतीमध्ये ठरले तर लगेच स्टेजवरील बॅनर बदलून, खिशावर शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला बिल्ला लावायचा, असा कदमांचा नेम आहे. मात्र, भाजपच्या वाढीसाठी झटणारे मनोज घोरपडे हे आपल्याला उमेदवारी मिळेल यासाठी आशावादी आहेत. अपक्षांचीही उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. युतीच्या उमेदवाराबाबतचा निर्णय लवकरच होईल. त्यानंतर उत्तरेत नुरा कुस्ती होईल की, कॉंटे की टक्कर होईल, हे समजेल.