कराड – आमदार पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा लढणार की विधानसभा हा सस्पेन्स कायम असताना सोमवारी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेसाठी दोन उमेदवारी अर्ज नेले आहेत. सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आघाडीच्या पातळीवर अद्यापही काहीही निर्णय न झाल्याने गुरुवार, दि. 3 रोजी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास त्यांनी दुजोरा दिला आहे.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकी बरोबर लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. मात्र भाजपचे उमेदवार उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला तिकीट देणार याची चर्चा असताना, या जागेसाठी काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. रविवारी झालेल्या कॉंग्रेसच्या बुथ कमिटी मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निर्णय दोन दिवसात घेऊ असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मध्येच राहावे, असे कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे. मात्र यावर आ. चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे दिलेली नाही.
आज सोमवारी विधानसभेसाठी दोन उमेदवारी अर्ज मनोहर शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी नेल्याने आ. चव्हाण हे कराड दक्षिण मधून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सातारा लोकसभा मतदार संघासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे, यावर त्यांना विचारले असता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. मात्र आघाडीच्या पातळीवर काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गुरुवार, दि. 3 रोजी मी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.