मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी २०१४ सालच्या निवडणुकीनंतरही काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, यासंबंधी आम्हाला कोणतीही कल्पना नसल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हंटले आहे.
अनिल परब यांनी म्हंटले कि, पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?
शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासाठी २०१९च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरुवातीला नकार दिला होता. परंतु, खूप विचाराअंती सोनिया गांधी सरकारमध्ये सामील होण्यास तयार झाल्या, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले होते. अशीच परिस्थिती पाच वर्षांपूर्वीही तयार झाली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतात सरकार बनवले होते. आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. त्यावेळीही भाजपला थांबवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन पक्षांचे एकत्र सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण विजय आणि पराभव होतच असतो. आमचा पराभव झाला तर आकाश कोसळले नाही. आम्ही याआधीही विरोधी पक्षात बसलो होतो, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक म्हणाले कि, शिवसेनेचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बोलणं झालं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. काँग्रेस एक वेगळा पक्ष आहे. त्यांना प्रस्ताव आला असावा. पण निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.