पाच विषयांवरच सात तास चर्चा : शेवटच्या तासात नऊ विषयांना मंजुरी दिल्याने गोंधळ
सोमेश्वरनगर – सोमेश्वर कारखान्याची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर विषय पत्रेकेतील 9 विषयांना सभासद, संचालक मंडळ, अध्यक्षांनी शेवटच्या तासात मंजुरी देत तब्बत आठ तासांनंतर सभा संपवण्यात आल्याने कारखाना कार्यक्षेत्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे, शहाजीराव काकडे, जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. दिंगबर दुर्गाडे, जिल्हा सदस्य प्रमोद काकडे, भरत खैरे, भाजप नेते दिलीप खैरे, सतिश खोमणे, रामचंद्र भगत, बी. जी. काकडे, विजय कोलते, तुकाराम जगताप, संभाजी होळकर, पोपटराव भोसले, सुनिल भोसले, गौतम काकडे, रमाकांत गायकवाड, विक्रम भोसले, माणिकराव झेंडे, दत्ता चव्हाण, सुदाम इंगळे, लक्ष्मण चव्हाण, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे, सर्व संचालकमंडळ, सर्व अधिकारी, कामगार, सर्व सभासद उपस्थित होते. सभेत विषय पत्रिकेतील 11 विषयांपैकी रात्री 8 वाजले तरी विषय क्रमांक 2 वरच चर्चा सुरू होती. माळेगावपेक्षा कमी दर, बायोगॅस, कोजन, बेसल डोस, कार्यक्षेत्रातील रस्ते हे सभासदांनी ऐनवेळी उपस्थित केलेल्या विषयांवर तब्बल सात तास चर्चा सुरू होती. विषय पत्रकेतील विषय नंबर 7 आणि 8 शिक्षणनिधी डिस्टलरी विस्तारीकरण हे प्रमुख विषय बाजूलाच पडले होते.
सोमेश्वर कारखान्याने चालु वर्षी 23500 वार्षिक अहवालाची छपाई केली होती. तो प्रति अहवाल 23 रुपये दराने मिळत असताना तो 26 रुपये दराने का करून घेतला? असा सवाल उपस्थित करून सतीश काकडे यांनी छपाईमध्ये 800 अहवाल बाद झाले असून याचे पैसे अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात करण्याची मागणी केली, अन्यथा साखर आयुक्तांकडे तक्रार करून ते वसूल करण्यात येतील, असा इशारा काकडे यांनी दिला. 25 हजार रुपये घेवून जर आपण ऑर्डर काढत असचाल तर हा कसला कारभार असा, आरोप करत याबाबत खुलासा करण्याचे आवाहन प्रमोद काकडे यांनी केला. कारखान्याचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल शेतकरी कृती समितीच्या वतीने कारखान्याच्या अधिकाऱ्यांचा प्रथमच सत्कार करण्यात आला.
साखर धंद्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अभिनंदन केले. गेल्या सहा वर्षांपासून बेसल डोसबाबत चौकशी केली नाही. मी शासनाचा संचालक असूनही मला माहिती दिली जात नाही. हे संचालकमंडळ निर्ढावलेले आहे.
– पी. के. जगताप, संचालक, शासननियुक्त
आपण साखर आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार आयुक्त चौकशी करतील आम्ही त्यांना उत्तर देवू. दहावेळा भ्रष्टाचार झाला आहे, असे म्हणत सभासदांची दिशाभूल करायची व साप साप म्हणून भुई धोपटण्यात काहीही अर्थ नाही.
– पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना