पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर खडसेंची पाठराखण

सोलापूर – 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असे गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाची पाठराखण केली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले कि, शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. २०१४ साली भाजप-शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली होती. तेव्हा युती नव्हती. त्यामुळे शिवसेनेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतात सरकार स्थापन केले होते. अशा स्थितीत इतर पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया केली असावी. सत्ता स्थापन करण्यासाठी यापूर्वीही असे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यात तथ्य असेल.

खडसे पुढे म्हणाले कि, २०१९ मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही टोकाच्या मतभेदामुळे सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झाले, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. मात्र तेव्हा कॉंग्रसने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यातील सध्याचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.