घोडनदी काठावरील मोटारीची केबल चोरी थांबेना

शेतकरी आर्थिक अडचणीत : पोलिसांना चोर सापडेना

– विशाल करंडे

लाखणगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील घोडनदी काठावरील विद्युत मोटारींच्या केबल चोरीला जाण्याचे प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. केबलचोरी संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करुनही चोरांचा थांगपत्ता लागत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर केबल चोरांना पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्‍यासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या घोडनदी काठावर मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारी बसवलेल्या असून नदीपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाइपलाइन करुन शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी नेले आहे, परंतु या विद्युत मोटारींपासून डीपी बॉक्‍सपर्यंत असणाऱ्या केबल मागील अनेक महिन्यांपासून वारंवार चोरीला जात आहेत. कळंब, पिंपळगाव, चांडोली, भराडी, निरगुडसर, पारगाव, काठापूर, देवगाव या परिसरातील अनेक मोटारींच्या केबलवर चोरट्यांनी अनेक वेळा डल्ला मारल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोटारीच्या डीपी बॉक्‍सपासून तर विद्युत मोटारीपर्यंत लागणारी केबल ही जवळपास पन्नास ते दोनशे फुटापर्यंत लांब असते. त्यामुळे या केबलची चोरी झाल्यानंतर नवीन केबल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करुनही या घटनेचा पंचनामा अनेक वेळा होत नाही.

याबाबत कुठलाही तपास होऊन एखादा चोर पकडल्याचे अजूनपर्यंत घडले नाही. त्यामुळे मोटार केबलची चोरी हा चोरांना सध्या सहज आणि सोपा मार्ग झाला असून याबाबत पोलीसही तपास करीत नसल्याने चोरांचे फावले आहे. चोर मोठ्या प्रमाणात मोटारींच्या केबल चोरी करीत आहेत. आंबेगाव तालुका पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते, परंतु हे होत असताना केबल चोरीने येथील शेतकरी हैराण झाला आहे.

शेतकरी हैराण
वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकरी हैराण झाला असून रात्रीच्या वेळी स्वतः मोटारींचे राखण करायचे किंवा पाणी भरायचे का? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. उन्हाळ्यात दोन-तीन महिने नदीला पाणी नसल्याने सर्वत्र मोटारी बंद होत्या. सध्या दोन महिनांत चांगला पाऊस झाला आहे. नदीला पाणी आले आहे. पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी मोटारी सुरू केल्या आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये मोटारींची केबल चोरी होऊ नये. चोरी झालेल्या मोटारींच्या केबलचा तपास पोलिसांना लावावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

पोलिसांनी केबल चोरांचा छडा लावण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. शेतीमध्ये आर्थिक मंदी असल्याने केबल खरेदी करणे शेतकऱ्यांना अवघड बनले आहे.वीस हॉर्सपॉवरच्या मोटारीसाठी दिडशे ते दोनशे फूट लांबीची केबल खरेदी करण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो. एवढा खर्च करणे शेतकऱ्यांना शक्‍य नाही. त्यासाठी पोलिसांनी केबल चोरांचा छडा लावणे गरजेचे आहे.
– रामदास वळसे पाटील, माजी उपसरपंच निरगुडसर

Leave A Reply

Your email address will not be published.