उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण?

राष्ट्रवादीपुढे मोठा पेच : पवार राजकीय अनुभव पणाला लावणार

सातारा –
अवघ्या तीन महिन्यांनंतर उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार, याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे आता उदयनराजेंच्या विरोधात कोणता उमेदवार रणांगणात उतरवायचा? असा पेच राष्ट्रवादीपुढे निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते आदींची नावे चर्चेत आहेत. चारही नेते दिग्गज असून त्यापैकी एकास रणांगणात उरतविल्यास लोकसभेचा सामना चुरशीचा होताना पाहण्यास मिळणार आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते प्राप्त झाली होती. उदयनराजेंच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत प्रथमच मताधिक्‍यामध्ये अडीच लाख मतांनी घट झाली. त्यामुळे विजयी होवूनदेखील उदयनराजेंनी गुलाल घेतला नव्हता. उलट तीन महिन्यांनंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये घरवापसी करून अचूक टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सातारा लोकसभा मतदारसंघ 1996 चा अपवाद वगळता कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. मात्र, यंदा उदयनराजेंच्या निमित्ताने भाजपमधून निवडून येवून दुसऱ्यांदा अपवाद घडणार का? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. उदयनराजेंच्या निमित्ताने कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याचा गड काबिज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.

उदयनराजेंना निवडून आणून भाजप सातारा लोकसभा मतदारसंघात शिरकाव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काही प्रमाणात बॅकफुटवर गेली आहे. असे असले तरी सातारा हा गेल्या वीस वर्षापासून पवारांचा गड राहिला आहे. पवार साताऱ्याचा गड सहजासहजी भाजपच्या ताब्यात जावू देणार नाहीत. 55 वर्षांचा संसदीय राजकारणाचा अनुभव ते आगामी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत लावणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. लोकसभा मतदारसंघापैकी सातारा विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य अद्याप कायम आहे. वाई, कोरेगाव, कराड-उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे कार्यकर्त्यांचे केडर मजबूत आहे.

कराड-दक्षिणमध्ये भाजपने शिरकाव केला असला तरी त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाची एकत्रित ताकद आघाडीच्या उमेदवाराला चांगल्या प्रमाणात मताधिक्‍य देवू शकते. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आगामी पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोप्पी असणार नाही. तीन महिन्यापूर्वी विरोधी पक्षातून निवडणूक लढविताना जेवढे परिश्रम घ्यावे लागले त्यापेक्षा आता सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर अधिक परिश्रम उदयनराजेंना घ्यावे लागणार आहेत. त्याबरोबर भाजपच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेते कशाप्रकारे प्रचार यंत्रणा राबवितात, त्यावरच आगामी पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

चव्हाण लोकसभेला, उंडाळकर विधानसभेला

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्यावतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चव्हाण लोकसभेच्या रणांगणात उतरले तर आपसुक कराड-दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरविण्यात येऊ शकते. साहजिकच त्याचा मोठा लाभ विशेषत: कराड-दक्षिण, कराड-उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातून चव्हाण यांना होऊ शकतो. तेव्हा चव्हाण लोकसभेच्या रणांगणात उतरतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.