हिंजवडी (रमेश ससार) – राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या हिंजवडी-कासरसाई या मुख्य रस्त्यावरील कासरसाई ओढ्यावरील पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. हा पूल नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
अनेक वर्षे या पुलाची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. पुलाच्या कठड्यांना भेगा पडल्या आहेत. तर पुलाचा स्लॅब देखील जीर्ण झाला असून काही ठिकाणी कठडे तुटले आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघाताचा धोका असून एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा सवाल शिवसेनेचे मुळशी तालुका संघटक माऊली केमसे यांनी केला आहे.
मुळशी आणि मावळ तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. या पुलावरून अवजड वाहनांची कायम वर्दळ असते. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला जाणाऱ्या उसाची अवजड वाहने याच पुलावरून मार्गस्थ होत असतात. तसेच मावळमधील एमआयडीसी उर्से एमआयडीसीकडे जाणारी अवजड वाहने या पुलावरून ये-जा करत असतात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता कासरसाई ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या पुलाची पाहणी करून त्याचे स्ट्रकचरल ऑडिट करून याठिकाणी नवीन पुलाची उभारणी करावी, अशी मागणी केमसे यांनी केली आहे.
मुळात हिंजवडी ते उर्से टोलनाका असा हा मुख्य रस्ता राज्यात भाजप सेना युतीचे सरकार असताना हायब्रीड अन्युअटी योजनेंतर्गत रुंदीकरण करून पक्का डांबरी रस्ता करण्याचे कंत्राट रोडवेज सोल्युशन कंपनीला दिले आहे. सुमारे 200 कोटी रुपयांचे हे कंत्राट असूनही या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. केवळ नेरे दत्तवाडी परिसरातील काही मोऱ्या बदलल्या असून जीर्ण झालेला हा पूल व त्यावरील रस्ता बनविण्यास कंत्राटदार जाणीवपूर्वक टाळाटाळ करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी त्यास आर्थिक हितसंबंधामुळे पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
हायब्रीड अन्यूअटी योजनेंतर्गत घोटावडे फाटा ते उर्से हा रस्ता सुमारे 225 कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर आहे. कासरसाई येथील पुलाचे काम करण्याची यामध्ये तरतूद आहे. मात्र, मागील तीन चार वर्षांपासून संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने नुकत्याच दिवाळी पूर्वी रोडवेज सोल्युशन कंपनीला नोटीस काढल्या आहेत. यामध्ये नवीन पुलाचे काम या टेंडर मध्ये समाविष्ट असल्याने त्यांना पुन्हा नोटीस काढणार आहोत.
– मधुकर भिंगारदिवे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी.