वाईत आज भाजपचे “विजय संकल्प’ बूथ संमेलन

 सात हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार : मदन भोसले

वाई  – वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघात भाजप बळकट करण्यासाठी संघटन पर्व मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करण्यात आली असून मतदारसंघात 448 बूथवरील प्रतिनिधीची निवडण्यात आले आहे. या तिन्ही तालुक्‍यांमधील पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांचे “विजय संकल्प’ बूथ संमेलन उद्या, दि. 31 रोजी सकाळी 10 वाजता शहाबाग येथील धनश्री मंगल कार्यालयात होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार असून संमेलनाला सात ते आठ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसले म्हणाले, पक्षाने मतदारसंघनिहाय विस्तारक नियुक्त केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बळकट करण्यात येत आहे. मतदारसंघात विस्तारक शैलेश तांदळे याच्या मार्गदर्शनाखाली बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पन्नाप्रमुख यांच्या शंभर टक्‍के नियुक्‍त्या झाल्या आहेत. प्रत्येक बुथप्रमुखासमवेत 25 ते 30 कार्यकर्त्यांची टीम आहे. मतदारांशी थेट संपर्क साधला जाणार असून यंदाच्या निवडणुकीत 220 जागा जिंकण्याचा निर्धार आहे. दरम्यान, याच दिवशी वाईतील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन होणार आहे.

वाई शहरात भुयारी गटर योजना व सांडपाणी प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी 42 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. शहरात सिद्धनाथवाडी पुलासाठी 3 कोटी 84 लाख रुपये तर किवरे ओढा पुलासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. शाळा नं. चारच्या नूतनीकरनासाठी 3 कोटी, साखेवाडी, सिद्धनाथवाडी येथील शॉपिंग सेंटर, भाजी मंडईसाठी पाच कोटी, रविवार पेठे ऍडव्हेंचर पार्कसाठी साडेतीन कोटी, मुस्लिमांच्या दफनभूमीसाठी संरभक भिंत व सुशोभीकरणासाठी 70 लाख रुपये, रविवारी पेठेत पीर दफनभूमीच्या पायऱ्यांसाठी 9 लाख रुपयांचा प्रस्ताव दिल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यमान आमदार अपयशी

वाईचे विद्यमान आमदार विकासकामांत पूर्ण अपयशी ठरले आहेत. त्यांच्या कामाचा लेखाजोखा निवडणुकीत मांडणार आहे. पावणेपाच वर्षांत आमदारांच्या कामात मी ढवळाढवळ केली नाही; पण कृष्णा नदीत मिसळणारे सांडपाणी वेगळे करण्यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत, असा सवालही मदन भोसले यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)