पुणे – पर्यावरणपूरक गणपतीची संकल्पना जोर धरत आहे, तर दुसरीकडे चायना मार्केटच्या माध्यमातून फोफावत चाललेल्या प्लॅस्टिक फुले आणि थर्माकोलने अक्षरश: बाजारपेठा भरून गेल्या आहेत. मात्र, महापालिका यावर कारवाई करत नसून, त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
प्लॅस्टिक मुक्त शहर करण्यासाठी महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी धडाकेबाज कारवाई करत प्लॅस्टिक पिशव्यांपासून प्लॅस्टिकची फुले, पाने जप्त करण्यात आली. थर्माकोलवरदेखील कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता ज्यावेळी प्रकर्षाने कारवाईची गरज आहे, त्यावेळी मात्र महापालिका प्रशासन गप्प आहे.
केवळ दुकानांमध्येच नव्हे ,तर रस्त्यांवरही अनेक पथारीवाले हा चायनीज प्लॅस्टिक वस्तू घेऊन बसलेले असतात. उत्सवाच्या काळात त्यांची संख्या प्रचंड असते. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
महापालिकेकडून कारवाई झाली तर ती एकाच ठिकाणी केली जाते, परंतु संपूर्ण शहरात एकाच वेळी ही कारवाई होणे आवश्यक आहे. मुळातच हा माल शहरात येताच कामा नये यासाठीची तजवीज महापालिकेने करणे आवश्यक आहे. आज कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी नव्हे तर त्याच दिवशी हे साहित्य पुन्हा विक्रीसाठी रस्त्यांवर दिसते.
अधिकारी म्हणतात, कारवाई सुरू
महापालिकेने शुक्रवारी बोहरी आळी येथील सहा व्यावसायिकांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच अंदाजे 125 किलो थर्माकोल जप्त केल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.