गणेशमूर्तीसाठी वापरले जाणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात न विरघळणारे असून, त्यामधील विविध रसायनांमुळे जलचरांचा मृत्यू संभवतो. अशा मूर्तीसाठी वापरले जाणारे रंगही विषारी घटकांनी युक्त असतात. या मूर्ती साच्यातून काढल्याने आकर्षक दिसतात, वजनाला हलक्या असतात, स्वस्तही असतात. पण शाडूमातीची मूर्ती पाण्यात विरघळते. त्यावर आपण वापरलेले हळदीसारखे नैसर्गिक रंगही पाण्यात विरघळतात. हे पाणी आपण परत झाडांना घालू शकतो. त्यामुळे दै. प्रभातने सुरू केलेली ही कार्यशाळा मोलाची असून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वत: केलेल्या गणेशमूर्तीविषयी आपलेपणाची भावना निर्माण करणारी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात जास्त मोठे सामाजिक उत्तरदायित्व आहे, असे मला वाटते.
– प्रमोद कांबळे, ज्येष्ठ शिल्पकार मार्गदर्शक
पुण्याच्या गणेशोत्सवाला महाराष्ट्रात मोठे आणि मानाचे स्थान आहे. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांचा शुभारंभ पुण्यातून होतो आणि मग राज्यभर त्याचे अनुकरण केले जाते. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना कायमचा निरोप देत, ग्रीन गणेशा उपक्रमातील सहभागी विद्यार्थी शाडूची गणेशमूर्ती स्वत: तयार करतील आणि त्याच गणेशाची मनोभावे प्राणप्रतिष्ठाही करतील. दै. प्रभातच्या या मोहिमेमुळे पर्यावरणविषयक जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे पुण्याजवळून वाहणाऱ्या मुळा-मुठा-पवना नद्यांचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
– मुक्ता टिळक, महापौर
पर्यावरणाची सद्यःपरिस्थिती पाहता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने विद्यार्थी सुबक मूर्ती तयार करायला शिकणार आहेत. यामुळे पर्यावरण सुरळीत राहण्यास हातभार लागेलच. त्याचबरोबर या उपक्रमाचे अनुकरण अनेक शाळा करतील, असा मला विश्वास आहे. यानिमित्ताने दै. प्रभातकडून आमच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला, ही खूपच समाधानाची बाब आहे.
– डॉ. शरद कुंटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष
दै. प्रभातने ग्रीन गणेशा मोहिमेच्या अंतर्गत एक अनुकरणीय मोहीम सुरू केली असून, यामुळे पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती पुण्यात मोठ्या प्रमाणात बसवल्या जातील, याबाबत विश्वास वाटतो. शाडूच्या मूर्ती स्वत: तयार करून त्यांची प्राणप्रतिष्ठा केल्याने एक वेगळा सामाजिक दृष्टिकोन या विद्यार्थ्यांमध्ये रुजतो आहे. दै. प्रभातच्या या समाजोपयोगी मोहिमेला आमच्या शुभेच्छा. एका सामाजिक जाणिवेतूनच आम्ही या मोहिमेत सहभागी झालो आणि असे उपक्रम वरचेवर राबवले जावेत, अशी आमची इच्छा आहे.
– प्रकाश धारिवाल, उद्योजक
सामाजिक सुधारणांचा जो वारसा पुण्यात निर्माण होतो, त्याचे अनुकरण देशभर केले जाते. दै. प्रभातने पुण्यात ग्रीन गणेशा कार्यशाळा घेऊन एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला आहे. गणपती हे बुद्धीची देवता असल्याने, पर्यावरण रक्षणाची बुद्धी गणेशानेच आपणा सर्वांना दिल्याची आमची भावना आहे. शाडूमातीची मूर्ती घडवण्याच्या कार्यशाळेमुळे एक प्रकारे या विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाचीच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या त्रासातून सुटका केली आहे. एक गणेशभक्त म्हणून या मोहिमेत आम्हाला सहभागी होता आले, याचा आनंद आहे.
– राजेश सांकला, सिद्धीविनायक ग्रुप
गणेशोत्सवामध्ये आपण दहा दिवस गणपतीची मनोभावे पूजा करतो. मात्र, त्याच गणेशमूर्तींची विसर्जनानंतरची स्थिती विदारक असते. त्यामुळे सर्वांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीऐवजी साध्या मातीची किंवा शाडू मातीची मूर्ती तयार करणे आवश्यक आहे. मूर्ती तयार करण्याची ही पद्धत केवळ स्वत:पुरती मर्यादित न ठेवता, सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठीच गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी दूत म्हणून काम केले पाहिजे. तसेच घरच्या गणपतीच्या मूर्ती आणि पर्यावरणस्नेही सजावटीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धेत अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी होणे गरजेचे आहे.
– दिलीप खेडकर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
नागरिकांनी त्यांच्या घरातील मूर्तींचे विसर्जन नदीत न करता, मनपाने नदीकाठी तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या हौदात करावे, या मोहिमेला पुणेकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. घरी बादलीमध्ये अमोनियम बायकार्बोनेट’ ही पावडर वापरूनही मूर्तीचे विघटन करता येते. तरीही काही नागरिक नदीतच म्हणजे वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जनाचा आग्रह धरतात. मात्र, अशा नागरिकांनीही आपल्या भावनांना मुरड घालून हौदामध्येच मूर्तीचे विसर्जन करणे गरजेचे आहे, शाडूची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची दै. प्रभातची मोहीम प्रशंसनीयच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण होणार आहे.
– ज्ञानेश्वर मोळक, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, मनपा, पुणे
पर्यावरण रक्षणाचे महत्त्व किती मोठे आहे, हे आजच्या पिढीला समजावून सांगणे गरजेचे आहे. जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून आम्ही पुणे शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यात आम्ही आमच्या कंपनीमार्फत हातभार लावत आहोत. मात्र, गणेशोत्सवामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या वापराने पाण्याच्या प्रदूषणाची मोठीच समस्या गेल्या काही दशकांत निर्माण झाली होती. आता शाडूमूर्तीच्या वाढत्या लोकप्रियतेने शालेय विद्यार्थ्यांनाही घरचा गणपती स्वत: तयार केल्याचा आनंद मिळत आहे, हेच ग्रीन गणेशा मोहिमेचे यश मानावे लागेल.
– सुनील दंडवते, पास्को एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स प्रा. लि.
शाडूमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे ही लहान मुलांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. इतकेच नव्हे तर साध्या मातीचीही मूर्ती तयार करता येते. यासाठी वेगळे विशेष साहित्य लागत नसल्याने अबालवृद्धांपासून सर्वांनाच ही मूर्ती तयार करता येते. प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदीत विरघळत नसल्याने त्याचा त्रास आपल्यालाच होतो. याउलट, शाडू किंवा साध्या मातीच्या मूर्तीचे बादलीत विसर्जन करून ते पाणी बागेसाठी वापरता येते किंवा या मातीची परत पुढल्यावर्षी मूर्ती तयार करता येते. अशा प्रकारे एकही वस्तू वाया न घालवता, कसलाही कचरा न होता या मूर्ती करता येतात.
– नितीन ठाकरे, शिल्पकार मार्गदर्शक