महाराष्ट्रात 21 ऑक्‍टोबरला मतदान ; 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी

महाराष्ट्र, हरियाणात एकाच टप्प्यात मतदान
21 ऑक्‍टोबर रोजी मतदान तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी
महाराष्ट्रासह हरियाणात आचारसंहिता लागू
निवडणुकीत प्लास्टिक वापरावर बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. आजपासून महाराष्ट्र आणि हरियाणात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनिल अरोरा यांनी आज पत्रकार परिषद घेत दोन्ही राज्यातील निवडणुकांचे नियोजन सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. तर हरियाणात 1.82 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात 1.8 लाख ईव्हीएम मशीन्सचा मतदानात वापर होणार आहे. तर राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. महाराष्ट्रात 288 तर हरियाणात 90 जागांवर निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या काळात खास सुरक्षा व्यवस्था राज्यांना पुरवण्यात येणार आहे. निवडणुकीत प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देशही यावेळी निवडणुक आयोगाकडून देण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांनी आपली गुन्हेगारीविषयीची माहिती आयोगाला देणे बंधनकारक आहे. 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर 4 ऑक्‍टोबरपर्यंत उमदेवारांना आपले अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 5 ऑक्‍टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर 7 ऑक्‍टोबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच दिवशी एकाच टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.