संगमनेरला तंबाखू-विडी कामगारांचे ठिय्या आंदोलन

मालक व कामगारांनी एकत्र येण्याचे आवाहन

संगमनेर – सरकारी कंपन्यांची सिगारेट उद्योगात मोठी गुंतवणूक असल्याने तंबाखू व बिडी उद्योगांवर दररोज नवनवीन निर्बंध येत आहेत. त्यामुळे तंबाखू, बिडी व्यवसायावर जाचक अटी लादण्यात येत आहेत. या अटी मागे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर तंबाखू व बिडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.

यावेळी येथून पुढची लढाई उत्पादक व कामगारांना हातात हात घालून लढावी लागणार आहे. सरकार सिगारेट उद्योगाला झुकते माप देऊन पारंपरिक तंबाखू-बिडी उद्योगातील लाखो ग्रामीण कामगारांच्या रोजगारावर गदा आणू पहात आहे. या उद्योगावर भरमसाठ कर लादण्यात आल्याने तंबाखू उत्पादनांची मोठ्या प्रमाणात नक्कल केली जात आहे. त्याचा थेट परिणाम तंबाखू उद्योगावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगारावर पडत असल्याने सरकार दरबारी मालक आणि कामगारांना एकविचाराने संघर्ष करावा लागेल, असे ज्येष्ठ उद्योजक राजेश मालपाणी यांनी सांगीतले.

महाराष्ट्र राज्य तंबाखू महासंघाचे अध्यक्ष कॉ. माधव नेहे, कॉ. कारभारी उगले, तंबाखू महासंघाचे सरचिटणीस ज्ञानेश्‍वर सहाणे, शांताराम वाळुंज आदी उपस्थित होते. तंबाखू व बिडी उद्योगांवर लादण्यात आलेल्या भरमसाठ करांसह विविध जाचक अटींच्या विरोधात तंबाखू व बिडी उद्योगाच्या मध्यवर्ती संघटनांनी आज मोर्चाने येऊन संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.

तंबाखू-विडी कामगार संघटनेचा विजय असो, लाल बावटे की जय, आमच्या मागण्या, मान्य करा अशा घोषणा दिल्या. दुपारी तीनच्या सुमारास उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी आंदोलकांची भेट घेत निवेदन स्वीकारले व कामगार संघटनांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)