पुणे – येत्या दोन महिन्यांत वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी केंद्र (पीयूसी) ऑनलाइन केली जाणार आहे. यामुळे या केंद्रात तपासल्या जाणाऱ्या सर्व वाहनांची माहिती केंद्र सरकारच्या परिवहन-वाहन पोर्टलला सादर करावी लागणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व पीयूसी केंद्र परिवहन विभागाच्या “वाहन’ प्रणालीशी जोडण्यात आले. दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तर, एप्रिलपासून महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, पीयूसी केंद्र चालकांकडे त्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नव्हती. ती खर्चिक असल्याने ती उपलब्ध करण्यास उशीर झाल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र, येत्या दोन महिन्यांत या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
केवळ 18 केंद्र जोडली
पुणे आरटीओ कार्यालय कार्यक्षेत्रात आतापर्यंत केवळ 18 पीयूसी केंद्र ऑनलाइन जोडण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक उपपरिवहन परिवहन कार्यालय आणि बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुक्रमे 11 आणि एक पीयूसी केंद्र वाहनाशी जोडले गेले आहे.
तपासणीबाबत शंका
शहरात 372 पीयूसी केंद्र असल्याची पुणे आरटीओकडे नोंद आहे. यातून तपासल्या जाणाऱ्या वाहनांच्या वायू उत्सर्जनाची चाचणी नेमकी कशी होते, या चाचणीमध्ये वायू उत्सर्जनाची कमाल पातळी किती ग्राह्य धरली जाते, याबाबत शंका उपस्थित होते.