कोरेगाव – शहर व तालुका शेतीप्रधान असून शेतीवरच स्थानिक बाजारपेठ अवलंबून आहे. त्यामुळे शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविला असून दोन टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिल्याने वसना, वांगणा व तीळगंगा या नद्या बारामाही वाहणारच आहेत. त्याचबरोबर ओढे-नाले देखील वाहते केले जाणार आहेत. त्यातून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्यांमुळे शेतीला या पाण्याचा फायदा होणार असून शेतीपूरक उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव शहरातील श्री केदारेश्वर मंदिरानजिक असलेल्या स्मशानभूमीचे तीन कोटी रुपये खर्चून सुशोभिकरण केले जात असून वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीचे देखील 15 लाख रुपये खर्चून सुशोभिकरण केले जात आहे. या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिनभैय्या बर्गे, स्वीकृत नगरसेवक मुन्नाभाई काझी, श्री केदारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्रबुवा बर्गे, विलासराव बर्गे, फत्तेसिंह बर्गे, उदयसिंह बर्गे, बाजार समितीचे माजी संचालक गुलाबराव बर्गे, संचालक सुनील निदान, संजय बर्गे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष वैभव उंबरदंड, उपाध्यक्ष महालिंग जंगम यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, “”कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने आपण केवळ निमित्त असून नागरिकांना विकासकामे हवी आहेत, त्या पध्दतीने करुन ती दिली जात आहेत. विरोधक केवळ टीका करण्यात धन्यता मानत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना मत्स्यशेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जिहे- कठापूर बंधारा असो अथवा मतदारसंघातील कोणताही बंधारा, तेथे नजिकच्या शेतकऱ्यांना प्रथिनेवर आधारित उद्योग करण्यासाठी मदत केली जाणार आहे. जगात आज हा उद्योग आघाडीवर असून, त्यातून मतदारसंघाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा उद्देश आहे.” शहराच्या सर्वच प्रभागांमध्ये आवश्यक तेथे निधी उपलब्ध करुन दिला आहे, सेही त्यांनी सांगितले.
सुनील खत्री म्हणाले, “”आमदार महेश शिंदे यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. सतत कार्यमग्न राहून ते जनतेची सेवा करत आहेत. आजवर मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आला असून, प्रत्येक गाव, वाडीवस्ती आणि विभागात दर्जेदार विकासकामे सुरु आहेत, ही आनंदाची बाब आहे.” सुनीलदादा बर्गे, महेश बर्गे यांनी शहरात आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. प्रारंभी शहरातील विविध बर्गे भावकी यांच्यावतीने आमदार महेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. स्वीकृत नगरसेवक मुन्नाभाई काझी यांचा सत्कार करण्यात आला. संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांनी आभार मानले.
केदारेश्वर मंदिराचा कायापालट करणार
माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी मनोगतामध्ये शहरवासियांची श्री केदारेश्वरावर श्रध्दा असून या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. त्याचा धागा पकडत आमदार महेश शिंदे यांनी “आपण मूळ मंदिराच्या ढाच्याला हात न लावता, सुंदर परिसर तयार करु. मंदिराच्या डिझाईन करणाऱ्या आर्किटेक्टना बोलावून घेऊन सुंदर प्लॅन करु, श्री केदारेश्वर मंदिर परिसराचा विकास करु, पाच काय अगदी तीस कोटी रुपये लागणार असतील, तर त्यासाठी आपण तयार आहोत. मात्र, मंदिर परिसराचा निश्चितपणाने कायापालट करु, असा शब्द देताच शहरवासियांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.