महापालिकेच्या आरोग्य विभागाचा इशारा
पिंपरी – स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज वापराविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कडक पाऊले उचलली आहेत. प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्यास, दुकानदारांनी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शहरात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी प्लॅस्टिकच्या छोट्या राष्ट्रध्वजची विक्री केली जाते. प्लॅस्टिक वापरण्यास राज्य सरकाने 23 मार्च 2018 रोजी बंदी घातली आहे.
राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध 1971 चे तरतुदीनुसार राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे ही बाब फौजदारी गुन्ह्यांस पात्र आहे. राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन बनविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन, विक्री आणि वापरास प्रतिबंध आहे.
तथापि, दुकानांमधून सर्रास प्लॅस्टिकच्या ध्वजाची विक्री होते. तसेच नागरिक देखील हे ध्वज खरेदी करतात. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दुकानांची अचानकपणे तपासणी करुन कारवाई केली जाणार आहे. प्लॅस्टिकचा ध्वज आढळल्यास नागरिकांना देखील कारवाईला सामोरे जावे लागेल. नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान करावा. प्लॅस्टिकचा वापर करुन बनविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.