“त्या’ आरोपीची दुचाकी पुलाजवळ आढळली

आत्महत्येचा संशय : अल्पवयीन विद्यार्थिनीचा लॉजवर नेऊन केला होता खून

वडगाव मावळ – लॉजवर नेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीचा खून केल्या प्रकरणी आरोपी फरार आहे. या आरोपीची दुचाकी इंद्रायणी नदी पुलाजवळ आढळली आहे. यामुळे त्या आरोपीने आत्महत्या केल्याची शक्‍यताही तपासण्यात येत आहे.

श्रीराम सुग्रीव गिरी (वय 20, रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे खून प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. आरोपी बुधवार (दि.4) दुपारी 3:15 वाजता निसर्गवारा हॉटेल लॉज, वडगाव-आंबी एमआयडीसी रोड, वडगाव (ता. मावळ) येथून फरार झाला होता. आरोपी दिशाभूल करुन फरार होऊ शकतो, मृतदेह सापडेपर्यंत त्याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान आरोपीची दुचाकी पुलाजवळ सापडली असल्याने मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक नदीत शोध घेत आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्रीराम गिरी याने अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फूस लावून बुधवार (दि.4) सकाळी 11.30 वाजता वडगाव हद्दीतील निसर्गवारा हॉटेल लॉजमध्ये बोलावून घेतले. तिथेच आरोपीने विद्यार्थिनीचा ब्लेडने गळा चिरून खून केला व तिला रक्‍ताच्या थारोळ्यात टाकून फरार झाला. मृत विद्यार्थिनी तळेगाव दाभाडे येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावी वर्गात शिकत होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक नितीन नम, उपनिरीक्षक दिलीप देसाई आदींनी भेट दिली. निसर्गवारा हॉटेल लॉजचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला असता, त्याने गुन्ह्यात वापरलेली (एम.एच 14 बी.डी 8362) क्रमांकाची दुचाकी कातवी येथील इंद्रायणी नदी पुलाजवळ आढळून आल्याने आरोपी श्रीराम गिरी याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.

आरोपी श्रीराम गिरी याला पोहायला येत नसल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. त्याचा शोध इंद्रायणी नदी पत्रात बोट व पाणबुडीच्या सहाय्याने मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक घेत आहे.
मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आरोपी दिशाभूल करु शकतो, असे मत व्यक्‍त केले. तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.