पालिकेत राष्ट्रवादीचे ‘खानावळ’ आंदोलन

पालिकेच्या पायऱ्यांवर बसून केले जेवण : आयुक्‍तांच्या कृतीचा तीव्र निषेध
पिंपरी – गत आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आपल्या कार्यालयात जेवण उपलब्ध करून देणाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असतानाच गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयुक्‍तांच्या विरोधात “खानावळ’ आंदोलन करण्यात आले. आयक्‍तांसोबत त्यांच्या कार्यालयात जेवणाचा हट्ट धरण्यात आला. मात्र पालिकेत प्रवेश देण्यात न आल्याने या नगरसेवकांनी पालिकेच्या पायऱ्यांवरच जेवण करत आयुक्‍तांच्या कृतीचा निषेध नोंदविला.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर तीन महिन्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महापालिकेत नुकतेच आले होते. यावेळी दुपारी ते महापालिकेच्या कॅंटीनमध्ये जेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आयुक्‍तांनी त्यांच्या कार्यालयातच पालकमंत्र्यांसह इतर उपस्थित मान्यवरांना जेवणाचा आग्रह धरला. तसेच जेवण कार्यालयातच जेवणाची मेजवानी उपलब्ध करून दिली. आयुक्‍तांच्या कार्यालयात जाहीर जेवणाचा कार्यक्रम होण्याची ही पहिलीच वेळ होती. सर्व प्रोटोकॉल गुंडाळून ठेवत आयुक्तांनी दिलेल्या जेवणावळीवर जोरदार टीका सुरू आहे.

या जेवणावळीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेत आम्हालाही आयुक्‍तांच्या कार्यालयात जेवण करावयाचे आहे, असा आग्रह धरत सोबत “व्हेज बिर्याणी’ आणली. भाजपाचे पदाधिकारी आयुक्‍तांसोबत जेवण करतात तर आम्ही का नाही? असा प्रश्‍न उपस्थित करत महापालिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या आंदोलकांना महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन करत या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत आयुक्‍तांचा निषेध नोंदविला.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, शहरातील नागरिक अनेक समस्यांनी ग्रासले असताना आयुक्तांच्या कार्यालयात खानावळी चालविल्या जात आहेत. बंद पाईपलाईनसह अनेक प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधारी आयुक्‍तांना अपयश आले आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही सत्ताधाऱ्यांसह आयुक्‍तांवर जोरदार टीका केली. या आंदोलनात आजी-माजी विरोधी पक्षनेत्यांसह ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू मिसाळ, मयूर कलाटे, मोरेश्‍वर भोंडवे, विक्रांत लांडे, वैशाली काळभोर, सुलोचना शिलवंत-धर यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक सहभागी झाले होते.

आयुक्‍तांना इडीची धमकी? – साने
आयुक्‍त श्रावण हर्डीकर हे पालकमंत्री व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह जेवण करू शकतात, तर आमच्यासोबत का नाही. त्यांना इडीच्या कारवाईचे भय दाखविले की काय? असा प्रश्‍न दत्ता साने यांनी उपस्थित केला.

आम्ही पालिकेतही “खातो’- पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, आमची फाईव्ह स्टार संस्कृती नसून आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी खातो. आम्ही पालिकेत काम करण्यासाठी आलो होतो, त्यामुळे जेवण केले. ऐशोआरामाची आम्हाला सवय नसल्याची पुष्टीही पवार यांनी यावेळी जोडली.

दोन वेळा आयुक्तांनी मोडला “प्रोटोकॉल’
महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना प्रोटोकॉल मोडत भाजपा कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर पालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना आयुक्‍त कक्षात जेवण उपलब्ध करून दिल्यामुळे आयुक्‍त पुन्हा टीकेचे धनी बनले आहेत. आयुक्‍तांनी पालकमंत्र्यांसाठी दोनदा प्रोटोकॉल मोडल्याची चर्चा आंदोलन स्थळी रंगली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)