50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात

पणजी : 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात शानदार कार्यक्रमाने प्रारंभ झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, सिनेसृष्टीतले महानायक म्हणून ज्यांचे योगदान ओळखले जाते असे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या दिग्गजांची उपस्थिती, शंकर महादेवन आणि जॅझचे दैवत मानले जाणारे लुई बॅन्कस्‌ यांचे बहारदार संगीतमय सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांनी गोव्यातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये झालेला हा उद्‌घाटन सोहळा रंगतदार ठरला.

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. फ्रेंच चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांचा यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सिनेसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रख्यात अभिनेते, भारतीय चित्रपट क्षेत्राचे थलैवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबीली ॲवॉर्डने गौरवण्यात आले. चित्रपट अभिनेते अमिताभ यांचा उल्लेख आपले स्फूर्तीस्थान असा करुन हा पुरस्कार आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह आपल्या चाहत्यांना समर्पित करत असल्याचे रजनीकांत यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले. सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्ताने यावेळी एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले. आई-वडिलांचा आर्शिवाद आणि जनतेचे सर्वात मोठे आभार अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी जनतेने साथ दिली, त्यांचे ऋण आपल्यावर आहे, या ऋणात आपण राहु इच्छितो, असे ते म्हणाले. या महोत्सवात कंट्री ऑफ फोकस रशिया असून, रशियात या रशियन चित्रपटांचा आनंद घ्या, रशियात चित्रपट बनवा तसेच एकत्र येऊन सहयोगाने चित्रपट निर्मिती करण्याचे आवाहन रशियाच्या प्रतिनिधीमंडळाच्या प्रमुखांनी केले.

या महोत्सवात 76 देशांमधले 200 हून अधिक उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात 26 फिचर फिल्म्स आणि 15 नॉन फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवात 10 हजारहून अधिक सिनेप्रेमी सहभागी होत आहेत. 28 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहिल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.