पुणे- व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण करून शिरूर येथून पुण्यात आणून डांबून ठेवत 50 लाखांची खंडणी किंवा 5 एकर जमीन कागदोपत्री नावावर करून मागणार मागणाऱ्या सहा जणांना खंडणी विरोधी पथक-1 ने बेड्या ठोकल्या. अटक केलेल्यांमध्ये शहर पोलीस दलातील एकाचा सहभाग आहे.
अनिल लक्ष्मण हगवणे (33), किरण सोपान भिलारे (35, रा. भिलारेवाडी, कात्रज), विशाल अनिल जगताप (22, भिलारेवाडी कात्रज), संदीप चंद्रकांत पोखरकर (24, धनकवडी), अभिजित दत्तात्रय देशमुख (29, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि पोलीस शिपाई मनोज ज्ञानेश्वर भरगुडे (32, रा. धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, सर्वांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. हितेश सोनार यांनी काम पाहिले. याबाबत टाकळी हाजी येथील एका तरुणाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.