पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यातील बदल महत्त्वपूर्ण आहेत. मात्र नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यावरून विद्यापीठाने घेतलेला निर्णयात त्रुटी असून, त्यात आणखी सुधारित बदल होणे आवश्यक असल्याचे स्वायत्त महाविद्यालयांचे म्हणणे आहे.
मार्गदर्शक सूचनांमध्ये काय?
स्वायत्त महाविद्यालयांना पूर्वपरवानगी न घेता नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र, प्रचलित श्रेयांक पद्धतीमध्ये बदल करता येणार नाही. नव्या अभ्यासक्रमाबाबत 1 मार्चपूर्वी विद्यापीठाकडे माहिती सादर करावी. अभ्यासक्रमाचा परिपूर्ण मसुदा प्राप्त झाल्यावर संबंधित अभ्यासक्रमाला संलग्नता दिली जाईल. 1 मार्चनंतर किंवा अपूर्ण माहिती पाठवल्यास नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही. सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षांच्या परीक्षा शुल्कापैकी 15 टक्के परीक्षा शुल्क जमा करावे. एकावेळी दोनपेक्षा जास्त अभ्यासक्रम किंवा तुकड्या सुरू करू नयेत.
काय बदल व्हावेत?
स्वायत्त महाविद्यालयाने एकावेळी दोन पेक्षा जास्त अभ्यासक्रम किंवा तुकड्या सुरू करू नयेत, ही बाब चुकीचे आहे. असे नियम असतील तर संस्थांना नवीन अभ्यासक्रम सुरू करता येत नाही. तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती
1 मार्चपूर्वी विद्यापीठाने सादर करणे शक्य नाही. पी.एचडी.संबंधी सर्व अधिकार विद्यापीठाने स्वत:कडे राखून ठेवले आहे. या तीन नियमांवर संस्थेने बदल करावेत, अशी मागणी होत आहे.
स्वायत्त महाविद्यालयासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समितीने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करून त्यात अनेक नियमांत सुधारणा केल्या आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. काही नियम संयुक्तिक नाहीत. त्यासंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी सकारात्मक बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. गजानन एकबोटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ