सातारा – “शासन आपल्या दारी’ योजनेचे राज्यात दीड कोटी लाभार्थी आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महायुतीच्या चांगल्या योजनांवर सातत्याने टीका करत आहेत. जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, राज्यात पावसाचा अनुशेष वाढल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीच्या उपायोजनांचे निर्देश दिले आहेत. “शासन आपल्या दारी’ या उपक्रमावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने आक्षेप घेत आहेत.
अहमदनगर जिल्हा दौऱ्यात त्यांनी या योजनेवर जोरदार टीका केली होती. या योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, असा प्रश्न त्यांनी केला होता. त्यांची वक्तव्ये निराधार आहेत. आमचे सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. ते मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते “ऑनलाइन’ मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांच्या काळात त्यांनी हे का केले नाही? महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही होतो. त्यांना अनेक वेळा मी यासंदर्भात प्रत्यक्ष दौरा करण्याचे सुचवले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावागावात पोहोचले आहेत. वैयक्तिक लाभांच्या योजना घराघरापर्यंत मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा पालकमंत्र्यांनी कधी केला होता का, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्याबाबत देसाई म्हणाले, रोहित पवार यांनी आमच्या जिल्ह्यात लक्ष घालू नये. त्यांचे त्यांनी बघावे. जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याबाबत विचारले असता, पत्रकार आणि देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
देसाई म्हणाले, माझ्याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानपासून कसे वंचित राहू शकतात? तुमच्याकडे लेखी माहिती असेल आणि ती कोणत्या विभागाकडून मिळाली, ते सांगा. अखेर कृषी व उपनिबंधक कार्यालयाकडून नेमकी आकडेवारी घेतो, अशी सारवासारव त्यांनी केली. अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, या दौऱ्याची मला काहीच माहिती नाही. त्यावर, आ. रामराजे यांनी या दौऱ्याची माहिती दिल्याचे सांगताच, त्यांचा दौरा शासकीय असेल, तर आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ, असे देसाई म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देसाई म्हणाले, विधी व न्याय विभागाचे मत घेऊनच कुणबी दाखले देण्याबाबत निर्णय घेतला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे. कोण मुख्यमंत्री असताना रिव्ह्यू पिटिशन फेटाळली गेली, याची माहिती घेतली जात आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली जाणार असून. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.