मुंबई – ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. महापालिकेशी संबंधित कथित खिचडी घोटाळ्यामध्ये (Khichdi scam) त्यांची चौकशी करण्यात आली आहे. अमोल किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र असून ते ठाकरे गटासोबत असल्यानेच त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अमोल किर्तीकर यांना समन्स देऊन आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. याआधी याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे अमोल किर्तीकर पुत्र आहेत.