नवी दिल्ली – विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाच्या (Women’s Reservation Bill) विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपली भूमिका मांडताना अजित पवार (Ajit pawar) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसेच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष केले.
संसदेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर होणाऱ्या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या विधेयकाला माझा पाठिंबा आहे. परंतु या विधेयकात एससी, एसटी आणि ओबीसीलाही सहभागी करून घ्यायला घ्यायला हवे. तुमच्याकडे सभागृहात 303चं बहुमत आहे.
तसेच, अनेक राज्यांमध्ये मोडतोड करून तुमचे सरकार आहे, तर त्यांनी एससी, एसटी, ओबीसी महिलांनाही लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. तसेच मराठा आणि धनगर आरक्षणावरही संसदेत चर्चा व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
तसेच अमित शहा म्हणाले होते की, भाऊ बहिणीचं कल्याण करतो. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, जे बहिणीचे कल्याण करु शकतील, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला मताचा अधिकार दिला. महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण दिले आहे. प्रमिला दंडवते यांनी सर्वप्रथम महिला आरक्षणाचे प्रायव्हेट बील आणले होते.
दुसरीकडे भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधात आहे. भाजपच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने माझ्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले. भाजपच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी मला टीव्हीवर ऑन रेकॉर्ड जाहीरपणे सांगितले की,
“सुप्रिया सुळे, घरी जा आणि जेवण बनवा. देश दुसरं कुणी चालवेल, आम्ही चालवू.’ ही भाजपाची मानसिकता असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यांच्यावरही निशाणा साधला.