भोर – कुलदीप कोंडे यांच्यासारखे बाहेरून आलेले आयाराम गेल्याने पक्षावर परिणाम होणार नाही. भोर तालुका पश्चिम विभागातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचे काम करणार आहोत, असा निर्धार उबाठा शिवसेनेच्या भोर तालुका पश्चिम विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे माजी जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षात प्रवेश केला असला तरी त्यामुळे ठाकरे गटावर काहीही परिणाम होणार नाही. भोर तालुक्यातील ठाकरे गट दुप्पट जोमाने महाविकास आघाडीचे काम करेल, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी भोर तालुका पश्चिम विभागातील शिवसेना कार्यकर्ते उध्दव ठाकरे गट कार्यकर्ते यांनी भोर गंगुताई पंतसचिव वाचनालय येथे पत्रकार परिषद घेऊन दावा केला. यावेळी भोर तालुका प्रमुख हनुमंत कंक, विजय भिलारे, रामचंद्र बोडके, विष्णू दानवले, दशरथ पिलाणे, विकास बांदल, अमोल बरदाडे, गोरख पवार, शंकर जाधव, निलेश बांदल, अनिल भेलके, अतुल अगणे, प्रमोद जगताप, नारायण मोरे, शिवाजी शिंदे,लक्ष्मण प्रधान, काका काटकर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे हेच बारामतीचे उमेदवार आहेत, असे मानून आम्ही काम करत आहोत. तेच पुढे सुरू ठेवू कोंडे यांच्यासोबत पदाधिकारीच नव्हे, तर कार्यकर्तेही जाणार नाहीत, असे भोर तालुका प्रमुख हनुमंत कंक यांनी सांगितले. कोंडे यांच्यासारखे बाहेरून आलेले आयाराम गेल्याने पक्षावर परिणाम होणार नाही. कोण शिवसेना सोडून गेले, त्याचा काही परिणाम शिवसेनेवर झालेला नाही. मूळ शिवसैनिक आणि पदाधिकारी आपल्या जागेवरच आहेत, असा विश्वास शिवसेना कार्यकत्यांनी व्यक्त केला.