पुणे– कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलांमध्ये बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून पुढे आली आहे. तसेच त्यांनी घातपातासाठी काही ठिकाणांची रेकीदेखील केल्याचेही पुढे आले आहे. दुचाकी चोरी या घातपाताला अंतिम स्वरूप देण्यासाठी केली गेली होती.
दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना दोन्ही दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्याबाबत दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याची (यूएपीए) कलमवाढ करण्यात आली. मोहंमद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (23)आणि मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी (24, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोथरूड पोलिसांनी त्यांना 18 जुलैच्या रात्री अटक केली होती. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहंमद शहनवाज आलम (31) पसार झाला आहे. दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने एटीएसने दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने दोघांना दि. 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.
“धर्मामध्ये सांगितलेल्या पवित्र गोष्टींसाठी दोघांची जीव देण्याची तयारी होती. त्यानुसार त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारणे, त्याबाबतचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात कारवाई करण्याची सर्व पद्धती दोघांनी आत्मसात केल्या होत्या. दोघांनी मागील काही वर्षे देशविघातक कृत्ये केली आहेत,’ असे सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयास सांगितले.
ती पांढरी पावडर स्फोटकच
दोन्ही आरोपींच्या घराची पोलिसांनी झडती घेतली होती. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटक असल्याचे “एक्सप्लोसिव्ह वेपर डिटेक्टर’मधून स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या श्वान पथकानेदेखील यासंबंधी अहवाल दिला आहे. हस्तगत करण्यात आलेली पावडर नेमके कोणते स्फोटक आहे, याचा तपास सुरू आहे. ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहे.