पिंपरी – पुणे रेल्वेच्या कामशेत रेल्वे स्थानकावर लोहमार्ग आणि सिग्नल यंत्रणेशी संबंधित कामे करण्यात येणार असल्याने पुणे-लोणावळा लोकलच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे. 10 ते 13 डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पुणे ते लोणावळा दरम्यानच्या दहा फेऱ्या रद्द केल्या आहेत. पुण्याहून सकाळच्या वेळेतील आणि लोणावळ्यातून प्रामुख्याने दुपारी तसेच संध्याकाळच्या कालावधीतील रेल्वे रद्द होणार आहे.
पुणे रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 10 ते 13 डिसेंबर या कालावधीत पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9.55, सकाळी 11.17, दुपारी 3.00 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. याच कालावधीत पुण्याहून तळेगावसाठी दुपारी 3.42 वाजता सुटणारी लोकलही धावणार नाही. त्याचप्रमाणे लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2.50, दुपारी 3.30, संध्याकाळी 5.30 वाजता सुटणारी लोकलही रद्द करण्यात येणार आहे. तळेगाववरून पुण्यासाठी दुपारी 4.40 वाजता सुटणारी लोकलही 10 ते 13 डिसेंबर या कालावधीत धावणार नाही.
मंगळवारी 13 डिसेंबरला पुण्यावरून लोणावळ्यासाठी दुपारी 4.25 वाजता सोडण्यात येणारी आणि लोणावळ्यावरून संध्याकाळी 6.20 वाजता पुण्याकडे सोडण्यात येणारी लोकलही रद्द करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे. रद्द करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये संध्याकाळी किंवा दुपारी लोणावळ्यातून सुटणाऱ्या आणि सकाळी पुण्यातून जाणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. या कालावधीत प्रामुख्याने नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी प्रवास करीत असतात. त्यामुळे या प्रवाशांची बंदच्या काळात गैरसोय होणार आहे.
सकाळी दहापासूनच्या अनेक फेऱ्या रद्द
करोना काळात पुणे-लोणावळा लोकलच्या रद्द केलेल्या फेऱ्या पूवर्वत करण्यात आलेल्या नाहीत. त्यात हे तीन दिवससकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधीतील फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या कमी होत असतानादेखील, परवडणारे तिकीट दर असल्याने प्रवाशांचे लोकल प्रवासाला प्राधान्य आहे. मात्र, आता कार्यालयीन कामकाजातील दोन दिवसांमधील दहा फेऱ्या रद्द केल्याने, याचा विद्यार्थी, नोरदार व दैनंदिन प्रवाशांना फटका बसला आहे.
– इक्बाल मुलानी, रेल्वे समिती सदस्य